पराभूत उमेदवाराच्या घरावर हल्ला, १४ जणांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः तुझ्यामुळेच पराभूत झालो असे म्हणत शिवसेना शिंदे सेनेच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला केल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे सीसिटिव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांग १५ मधून बंटी चावरिया हे भाजपचे उमेदवार होते. तर मिल्लू चावरिया हे याच प्रभागातून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीला उभे होते. काल मतमोजणी झाल्यानंतर मिल्लू चावरिया यांचा पराभव झाला. दुसरीकडे भाजपचे बंटी चावरियाही पराभूत झाले. येथे एसटी गटातून सचिन खैरे निवडून आले आहेत. पराभव झाल्याने मिल्लू चावरिया यांचा संताप अनावर झाला. तुझ्यामुळेच माझा पराभव झाला असे म्हणत त्यांच्या समर्थकांनी मध्यरात्री बंटी चावरिया यांच्या घरावर हल्ला चढवला. मिल्लू चावरिया यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप बंटी चावरिया यांनी केला आहे. या घटनेचे सीसिटिव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे. त्यात काही तरूण बंटी चावरिया यांच्या घरावर दगडफेक करताना दिसून येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी १४ जणांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.